विशेष लेख : रिक्षावाला सुसाट सुटला मर्सिडीसवाला मागे राहिला .

शब्दांकन : व्ही. आर.भोसले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यभार स्वीकारला .म्हणजे ते मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाय रुजू झाले .
टीव्ही वर हे दृश्य साऱ्या महाराष्ट्राने पाहिले .
तिथला पट्टेवाला सुद्धा एकदम ऐशींन दिसला ,पोलीस व रक्षक सुद्धा तसेच दिसले .बॉडी लॅंग्वेज बरंच कांही सांगुन जाते .एवढा उत्साह यांच्यात आला कुठून .? घरचंच कोणीतरी लांबचा प्रवास करून आलंय व त्याच्या स्वागतासाठी सगळे कुटुंबीय धावाधाव करतंय असं ते वातावरण होतं .
एकनाथ शिंदेनी प्रथम शिवछत्रपतींच्या प्रतिमेस वंदन केले .,बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे यांच्याही प्रतिमेला वंदन केले .पूजा झाली ,विधिवत आसन ग्रहण केले . हे सिंहासन नव्हते .हे सेवेचे आसन आहे याची पूर्ण जाणीव असलेला एक शेतकरी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसत होता.
उद्धवजी तुमचं इथंच चुकलं.
तुम्हीं त्या खुर्चीला सिंहासन समजले .फक्त आदेश देणें हा शिवसेनेचा नियम तुम्हीं इथंही वापरलात .
राजाला अपमान सहन होत नाही .जरा आठवून पहा .
कंगना,गोस्वामी ,नारायण राणे ,बिहार आय पी एस ,राणा दांपत्य यांना जी वागणूक आपल्या सरकारने दिली ती लोकशाहीला काळिमा फासणारी होती .
शरद पवार यांना बाळासाहेबांनी मैद्याचे पोते म्हटले होते .ते नुसते हसले होते .व्यंगचित्रकार याशिवाय काय म्हणणार म्हणून केंव्हाच सोडून दिले होते .महाराष्ट्राची सारी सूत्रे त्यावेळी त्यांच्याच कडे होती .
तुमच्या पन्नासभर आमदार व दहा खासदार यांनी उठाव करावा ही कांही साधीसुधी गोष्ट नाही .आपलं कुठंतरी चुकतंय हे अजून आपण मान्य केलेलं नाही .
संजय राऊत तर मर्यादा सोडून बोलतात .रेडे,डुकरं ,प्रेते ,लोटांगण अशी त्यांची संभावना करतात.आदित्य सुद्धा मुद्दा सोडून बोलू लागलेत .
एकनाथ शिंदे हे रिक्षा चालक होते .ते मुख्यमंत्री झाले .त्यांचं अभिनंदन करण्याऐवजी आपण ‘रिक्षा सुसाट सुटली’ अशी त्यांची संभावना केलीत .
आपण मर्सिडीस सारख्या महागड्या गाडयातून फिरता .वर्षा वर किती दिवस राहिलात ? मास्क काढून कार्यकर्त्यांशी सतत संवाद साधला असतात तर ही वेळ आली नसती .
शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना सुद्धा अवहेलनेला सामोरे जावे लागते .शिवसेनेवर अन्याय होतो हे लक्षात आल्यावर त्यांनी उठाव केला .
मंत्रीपदाचाही त्याग केला .तुम्ही समजून उमजून राजीनामा दिलात हे खरंच चांगलं झालं .
११ जुलै ची सुप्रीम मधील सुनावणी ,तीन तीन निष्णात वकील .लाखांची उधळपट्टी ही कशासाठी ?
एकनाथ शिंदेंचे सरकार पाडण्यासाठी ?
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा झाला की सरकार कोसळते ,नवीन सरकारने रीतसर विश्वासदर्शक ठराव मंजूर केलाय .हे सगळे मुद्दे कोर्टात येतील.
दोन तृतीयांश आमदारांनी कुठल्या दुसऱ्या पक्षात आपला गट विलीन केलेला नाही .
ते शिवसेनेशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले आहेत .तुम्हीं ?
महाराष्ट्राला आज शिवसेनेसारख्या झुंजार संघटनेची गरज आहे .निदान मुंबईला तरी आहेच आहे .
व्हीटी स्टेशनला शिवछत्रपतींचे नाव बाळासाहेबांचे मुळे मिळालंय . ते खरं तर फक्त शिवाजी टर्मिनस अस असायला हवं होतं. मुंबईकरांनी त्याचं सी एस एम टी किंवा छशिमट करून टाकलंय .कोल्हापूरकरांनी ६४ साली शिवाजी विद्यपीठ हेच नाव स्वीकारलं .त्यांना शिवाजी त्यांच्या हृदयात हवा होता .खांद्यावर नव्हे .
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवरायांचे नाव दिले आहे .तो विमानतळ अदानी ने विकत घेतलाय .अदानी विमानतळ नाव देण्याचा घाट त्यांनी घातला होता. तो शिवसेनेनेच मोडून काढलाय .
विमानतळ जाईल, नाव नाही .
शिवसेनेचा हाच बाणा आजही हवा आहे .
शिंदे गट सत्तेसाठी गेलाय की शिवसेनेसाठी गेलाय हे लवकरच सिद्ध होईल .आज तरी रिक्षा सुसाट आहे .
तिचा लिव्हर हातात आहे पायात नाही .
मर्सिडीस मधून पाय उतार होऊन त्यांच्या बरोबर भगवा हातात धरा .
तुमच्या बद्दल त्यांच्या मनात अजूनही आदर आहे .अन्याय झाल्याने उद्विग्न झाले आहेत .
कायद्याच्या लढाईत हारजित महत्वाची नाही .
रिक्षा आणि मर्सिडीस यांची रेस ससा आणि कासव यासारखी होऊ नये हे महत्त्वाचे आहे .
शब्दांकन : व्ही. आर.भोसले