ताज्या बातम्या

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या आपल्या देशाला सावरायला हवे

NIKAL WEB TEAM : 

कोरोनाची पहिली लाट २२ मार्च २०२० पासून सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाची दुसरी लाट आली,आता पुढे तिसरी लाट येणार, लहान मुलेही कोरोनाच्या तिसन्या लाटेचे बळी ठरतील अशी भीती सर्वत्र व्यक्त होत आहे. आज तर कोरोनामुळे अनेक लोक दगावले आहेत. अनेकांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. आजच्या घडीला पेशंटना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर कमी पडू लागले आहेत. माणसाने अमानुषपणे वृक्षतोड केली नसती आणि निसर्गाचे संगोपन केले असते तर आज ऑक्सिजनसाठी तडफडण्याची वेळ आपल्यावर आली नसती.

वाढते ग्लोबल वार्मिंग, पर्यावरणाचे असंतुलन, वारेमाप पध्दतीने होणारी वृक्षतोड, जंगली प्राण्यांची होणारी शिकार यामुळे निसर्गाचे चक्र बिघडले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणाचा पोत ढासळला आहे. त्यामुळे मोकळी हवा व श्वास घेणेही आज अवघड झाले आहे. विशेषतः आपण देशातील विविध राज्यांचा विचार केला तर ईशान्येकडील सिक्कीमसारख्या राज्यामधील पर्यावरणाचा स्तर आरोग्यासाठी खूपच उत्तम आहे. त्यामुळे तेथील व्यक्तींचे आरोग्य चांगले आहे. लोक आजारी पडण्याचे प्रमाणही खूपच कमी आहे. तेथून आपल्या राज्यात आले की आपल्या येथील ऑक्सिजनची पातळी व हवेची गुणवत्ता किती खराब आहे याची प्रचिती येते.

प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात :

आपल्या राज्यातील वाढते शहरीकरण, बकाल वस्त्या, वाहनांचे वाढते प्रमाण यामुळे प्रदूषित झालेले वातावरण यामुळे लोकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. हे प्रश्न आपणच निर्माण केले आहेत. यावर्षी लॉकडाऊनमुळे आपल्या देशातील वायू प्रदूषण कमी झाल्याने पंजाबमधून हिमालय दिसत होता. यावरून आपण किती प्रदूषण वाढवून ठेवले आहे याची कल्पना येईल. कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन केल्यामुळे प्रदूषणाची पातळी गेल्या वर्षी कमी झाली होती. त्यामुळे कोरोना गेला तरी दरवर्षी देशभर प्रदूषण कमी करण्यासाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी किमान दहा दिवसाचा लॉकडाऊन केला पाहिजे असे माझे मत आहे.
दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पर्यावरण संमेलनामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याबाबतचा ठराव मंजूर केला होता. दरवर्षी एखादी थीम ठरवून पर्यावरण सुधारण्याबाबत प्रयत्न केले जातात. इकोसिस्टीम रिस्टोरेशन म्हणजेच परिसंस्थेची हानी रोखत तिचे संतुलन भरून काढण्याचा प्रयत्न करणे ही सन २०२१ सालची थीम आहे. यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. दरवर्षी एका देशाकडे पर्यावरण दिनाचे यजमानपद असते. त्यानुसार देशात त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम पार पडतात.

ऑक्सिजन कमतरतेला आपणच जबाबदार :

निसर्ग वाचला तर पृथ्वी वाचेल आणि तरच मानवी जीवन सुखकर होवू शकेल, वाढत चाललेल्या कार्बन डाय ऑक्साईडमुळे आज अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. जागतिक तापमान वाढ, दरवर्षी जंगले नष्ट होत आहेत. जमिनीतील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नष्ट होत आहेत. वायुप्रदूषण, आवाजाचे प्रदूषण यामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. ऑक्सिजनची निर्मिती नैसर्गिकरित्या होण्यावर माणसांनीच मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे आज

ऑक्सिजनची समस्या गंभीर बनली आहे.

मानवी जीवनाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी बनली पाहिजे. पर्यावरणाविषयी समाजात जागरूकता निर्माण होण्याची आवश्यकता आहे. वृक्षारोपन ही चळवळ बनली पाहिजे. प्लास्टिकचा वापर कमी करणे, घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे, कारखान्यांकडून होणारे जल व वायू प्रदूषण तसेच वाहनांकडून होणारे वायुप्रदूषण कमी करणे यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. पाणी साठ्यांचे जतन संवर्धन, वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करणे, सांडपाणी नद्यानाल्यांमध्ये मिसळण्याने ते विषारी बनत आहे. त्यामुळे त्याचा वन्यजीव, मनुष्यप्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पाणी शुध्दीकरण यंत्रणा उभारण्याची गरज आहे. विजेचा अनावश्यक वापर टाळणे, पर्यावरण वाचविण्यासाठी, त्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी व्यापक अभियानाची गरज आहे.

संतुलन बिघडल्यामुळे आपत्ती :

गेल्यावर्षी निसर्ग वादळ, यावर्षी तोक्ते वादळ, यास वादळ आले. भूकंपाचे धके अधूनमधून बसत आहेतच. निसर्गातील हे बदल पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यानेच होत आहेत याचाही आपण विचार केला पाहिजे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या परिसरातील पर्यावरणाची गुणवत्ता चांगल्या पध्दतीची ठेवण्याबद्दल जागरूक राहिले पाहिजे व समाजातही जागरुकता निर्माण केली पाहिजे.

कोरानाने मानवी जीवनाची झालेली अपरिमित हानी विचारात घेवून यापुढे तरी आपण पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. यावर्षी कोरोनामुळे वन खात्याचा निधी रोपवाटिकांपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे रोपवाटिकेतून रोपे मिळतील या अपेक्षेवर न राहता प्रत्येकाने आपल्या घर, परिसर, रस्ते व शेतामध्ये विविध प्रकारच्या रोपांची निर्मिती करून त्याचे संवर्धन केले पाहिजे, अगदी काही जमले नाहीतर आपल्या परसबागेमध्ये तुळशीची रोपे तयार करून ती लावली तरीही आपल्या परिसरात ऑक्सिजनची चांगली निर्मिती होवू शकेल. पर्यावरणाचे संतुलन राखून आपण आपले आरोग्य सुधारण्याचे अभियान आपल्यापासूनच सुरू करूया यातच मानवजातीचे हित आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks