निराधारांची पेन्शन दोन हजार रुपये करण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही ; कागलमध्ये संजय गांधी निराधार योजना मंजूरीपत्रे वाटप

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शासनामार्फत सुरू असलेल्या निराधारांच्या योजना वृद्धांसह विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग यांच्यासाठी आधार बनल्या आहेत. निराधारांच्या अडीअडचणी समजून वेळोवेळी आपण कायद्यामध्ये बदल केले आहेत. त्यामुळेच लाखो निराधार आज या योजनेचा लाभ घेत आहेत. पूर्वी केवळ २५० रुपये पेन्शन होती. ती आपण पंधराशे रुपयेपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सध्या ही पंधराशे रुपये पेन्शन तुटपुंजी असून निराधारांची पेन्शन दोन हजार रुपये करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल येथे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या १५० लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांच्या वाटपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.
नामदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, निराधारांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी उत्पन्नाची अट, वयाची अट कमी करून कायद्यात बदल केले आहेत. आपल्या गावात कोण निराधार आहेत , विधवा, परीत्यक्त्या आहेत. त्यांना कोणत्या योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे, यासाठी कार्यकर्त्यांनी आपला परिसर पिंजून काढावा. त्यांनी अजिबात थांबू नये. राजकारणात प्रवेश करावयाचा असेल तर सेवाभावाचे काम केलेच पाहिजे, असे सांगितले. आपण आत्तापर्यत तालुक्याचा विकास आरोग्य व सर्वसामान्यची सेवा करण्यात धन्यता मानली आहे, असेही सांगितले.
कार्यकर्ते, पदाधिकारी व निराधार योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.