स्टँड अप इंडिया योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याकरिता पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तब विशाल लोंढे यांनी केले आहे.
केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेंतर्गत सिडबीने या रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाते त्याला सिडबी हमी देईल. या योजनेंतर्गत संबंधित लाभार्थ्यांनी त्यांचा स्वहिस्सा म्हणून प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के रक्कम द्यावयाची आहे.
या योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया या योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित मार्जिन मनी 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल.